गुहागर : मनी ट्रान्सफरच्या दुकानात येऊन पैसे ट्रान्सफर करायला सांगून ते पैसे न देता तिथून पळ काढत २५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथे १९ नोव्हेंबर रोजी रात्री घडला. याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात गणेश उगलमुगले (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आजीम दाऊद साल्हे (३५) यांनी फिर्याद दिली आहे. आजीम साल्हे यांचे श्रृंगारतळी भागात मनी ट्रान्सफरचे दुकान आहे. १९ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास गणेश उगलमुगले हे दुकानात आले. त्यांनी बँकेच्या खात्यावर २५ हजार रुपये ट्रान्सफर करायला सांगितले. साल्हे यांनी ही रक्कम गणेश उगलमुगले यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली. मात्र, त्यानंतर उगलमुगले यांनी ही रक्कम साल्हे यांच्याकडे जमा केली नाही. ही रक्कम न देताच त्यांनी तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साल्हे यांनी गुहागर पोलिस स्थानकात रविवार 24 रोजी रात्री फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुहागर पोलिस स्थानकात गणेश – उगलमुगले यांच्याविरोधात भारतीय – न्याय संहिता अधिनियम २०२३ चे – कलम ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागर पोलिस अधिक तपास करत आहेत.