रत्नागिरी : आर. डी. नॅशनल महाविद्यालय बांद्रा-मुंबई येथे झालेल्या मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रत्नागिरीतील जाधव फिटनेस अॅकॅडमीच्या पार्थ जाधव याने रौप्यपदक पटकावले. तो गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सहभागी झाला होता. आर्ट शाखेच्या प्रथम वर्गात असून, त्याने ५५ किलो वजनी गटात सहभागी होऊन स्नॅच ६० किलो व क्लीन अँड जर्क ८३ किलो उचलून एकूण १४३ करून रौप्यपदक मिळवले. त्याचे वजन मॅनेज करण्याच्या प्रयत्नात सुवर्णपदक ७ किलोने हुकले. त्याची पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. हेमंत जाधव स्वतः वेटलिफ्टर व पॉवरलिफ्टर असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ सराव करत असून, भविष्यात जिल्ह्याला वेटलिफ्टिंगमध्ये छत्रपती पुरस्कार मिळवून देण्याचा अॅकॅडमीचा प्रयत्न असणार आहे. डॉ. विनोद शिंदे, मदन भास्करे, जीम प्रशिक्षक शुभम जोशी व अॅकॅडमी संचालक हेमंत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पार्थला जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे नेहमीच सहकार्य मिळते. मंत्री उदय सामंत आणि अॅकॅडमीचे अध्यक्ष भैया उर्फ किरण सामंत यांनी पार्थचे अभिनंदन केले.