रत्नागिरी : बॉडीबिल्डिंग आणि फिजिक असोसिएशनमार्फत लवकरच उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय चिपळूण येथील बैठकीत घेण्यात आला. तसेच दापोली श्रीचेही आयोजन करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
बॉडीबिल्डिंग आणि फिजिक असोसिएशन या वेट ग्रुप असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच चिपळूण येथे फ्लेक्स जीमचे मालक संदीप नाचणकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक जाधव फिटनेस अॅकॅडमीचे हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील संघटनेच्या वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष इरफान कादरी, खजिनदार भूषण शिंदे व महेश वादक यांनी भविष्यात स्पर्धा कशाप्रकारे आयोजित कराव्यात यावर साधकबाधक चर्चा झाली.
सुरवातीलाच निवडून आलेल्या सर्वच आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून सर्वांचे आभार मानण्यात आले व भविष्यात प्रत्येक आमदारांकडून किमान एका स्पर्धेची स्पॉन्सरशिप घेण्याचे ठरवण्यात आले. त्यावेळी संदीप नाचणकर, एम. फिटनेसचे मालक, अमोल जाधव व हेमंत जाधव यांनी सामंत बंधूंच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले तर दापोली श्रीचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे सूरज पाटणे, राज कारेकर, सदानंद बारटक्के व महेश वादक यांनी जाहीर केले. यावेळी नीता कारेकर, कारेकर सर, प्रणीता घाडगे, आकाश पाटील व पार्थ जाधव उपस्थित होते.