पोलीस अधीक्षक कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी अभिनंदन करून जाहीर केले 10 हजारांचे बक्षीस
तुषार पाचलकर / राजापूर
रत्नागिरी पोलीस दलातील महिला पोलिस कॉन्स्टेबल शीतल पिंजरे यांनी ७३ व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकावत रत्नागिरी पोलीस दलाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशाचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. तसेच 10 हजारांचे बक्षीसही दिले.
दरम्यान 9 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत नवी दिल्ली येथे “७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा” पार पडली. या स्पर्धे मध्ये संपूर्ण भारतातून एकूण ४० विविध पोलीस दलातील संघांनी भाग घेतला होता. या मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा देखील सहभाग होता.
७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धे मधील “उंच उडी“ या स्पर्धेत रत्नागिरी पोलीस दलाच्या महिला पोलीस कॉंस्टेबल श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सहभाग घेतला होता. पोलीस कॉंस्टेबल श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांनी “उंच उडी“ या स्पर्धे प्रकारामध्ये “1.63 मिटर“ उंच उडी मारून आपले नाव “कांस्य” पदकावर कोरून महाराष्ट्र पोलीस दलाची तसेच रत्नागिरी पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
“७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा” मधील पोलीस कॉंस्टेबल श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे तसेच ₹ १०,०००/- बक्षीस देखील जाहीर केले आहे.