संगमेश्वर:-चिपळूण-संगमेश्वर विधानसभेची निवडणूक मुद्द्यांवर न होता धनशक्तीच्या जोरावर झाली. ज्यांनी धनशक्तीचा वापर अधिक प्रमाणात केला, असेच उमेदवार रिंगणात आघाडीवर राहिले. हा लोकशाहीचा विजय नसून धनशक्तीचा आणि पैशांचा विजय आहे,अस आमचं स्पष्ट मत आहे.अशी भूमिका गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी निकालानंतर मांडले आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा भारतीय लोकशाहीत समान पातळीवर सर्व उमेदवारांना निवडणूक लढवता येत नाही याचा अनुभव गाव विकास समितीने या निवडणुकीत घेतला.धनसंपत्तीच्या जोरावर प्रचंड शक्तिशाली लोक एक वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढतात. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन मैदानात उतरणारे आमच्यासारखे सर्वसामान्य उमेदवार हे त्या तुलनेत फार फार मागे राहतात. चिपळूण संगमेश्वर मध्ये गावांच्या भविष्याची लढाई गाव विकास समितीच्या माध्यमातून आम्ही लढलो.
हॉस्पिटल, रोजगारासाठी एमआयडीसी,ग्रामीण शाळांचा शैक्षणिक दर्जा पायाभूत सुविधा या जनतेच्या हिताच्या मुद्द्यांना पाठबळ मिळू शकला नाही. कारण गावागावात अक्षरशा पैशाचा महापूर आणला गेला. शक्तिशाली उमेदवाराकडून पैशांचे वाटप होऊन ही निवडणूक लढली गेली.चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात पैसा जिंकला आणि गाव हरली असंच आमचं एकंदरीत मत असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील तरुणांनी आणि सुजाण नागरिकांनी याबाबत योग्य ती दखल घेऊन सुधारणा केल्या नाहीत तर आज जी गावांची भयानक परिस्थिती आहे ती अजून विदारक होण्यास वेळ लागणार नाही.
गावच्या गाव विस्थापित होण्यास वेळ लागणार नाही खरंतर ग्रामीण भागातील लोकशाही मजबूत करण्याचं काम शिकलेल्या लोकांनी करायला हवं पण दुर्दैवाने या निवडणुकीत शिकलेल्या लोकांकडून सुद्धा काही ठिकाणी पैशांच्या जोरावर मतदान होण्याचे प्रकार घडल्याची अनेक भागात चर्चा आहे हे गंभीर असून सुशिक्षित तरुणांनी याबाबत स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवरच यापुढे मतदान व्हायला हवं असा आग्रह धरायला हवा असेही गोताड म्हणाले.