रत्नागिरी : रत्नागिरीत चोरट्याने पुन्हा डोके वर काढले आहे. रात्रीच्या वेळेला होणाऱ्या चोऱ्या आता भर दिवसा करण्याची हिम्मत चोरट्यामध्ये आली आहे. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे श्रीरामनगर व गणेश कॉलनी येथे भर दिवसा दोन घेरे फोडून चोरट्यांनी 5 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचणे गणेशकॉलनी येथे नागेश प्रकाश गजबार यांचे घर आहे. ते कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान शनिवार 23 नोव्हेंबर रोजी दुपारी चोरटयाने गजबार यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल़ा. त्यानंतर घरातील 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
दुसऱ्या घटनेत नाचणे श्रीरामनगर येथे चोरटयाने घरामध्ये कुणीही नसल्याचा फायदा उठवत 3 लाख 59 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये 1 लाख 33 हजार 400 रुपये रोख, 1 लाख 22 हजार रुपयांचे 35 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, 70 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 21 हजार रुपये किमतीचे 6 ग्रॅम वजनाची ठुशी, 5 ग्रॅम वजनाची 35 हजार 500 रुपयाची सोन्याची अंगठी, 52 हजार 500 रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 17 हजार 500 रुपयांची व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 12 हजार 500 रुपये किमतीच्या 3.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील पट्टया आदींचा समावेश आहे.
चोरीप्रकरणी शहर पोलिसांनी चोरटयाविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (अ), 331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी नोंद केलेल्या चोरटयाच्या वर्णनानुसार वय अंदाजे 30 वर्षे, रंग सावळा, चेहरा उभा, दाढी-मिशी, अंगात काळ्या रंगाचे फुल टी-शर्ट, राखाडी रंगाची जीन्स व पायात काळ्या रंगाची चप्पल असा पेहराव आहे. या दोन्ही घटनेचा तपास पोलीस करत आहेत.