मुंबई:-हर्निएटेड डिस्कच्या आजाराशी झुंज देत असलेल्या एका 60 वर्षीय महिलेने हे सिद्ध केले की लोकशाही कर्तव्य पार पाडताना कोणताही अडथळा फार मोठा नसतो. सदर महिला रुग्ण यांची हर्नियेटेड डिस्क स्थितीमुळे हालचाल मर्यादित होती.
त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष रुग्णवाहिकेच्या मदतीने 153-दहिसर विधानसभा मतदारसंघातील सेंट फ्रान्सिस शाळेत असलेल्या मतदान केंद्रात पोहोचल्या.
सर्वसमावेशकता आणि सुलभता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाचे समर्पित प्रयत्न येथे दिसून आले. संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान सदर महिलेला मदत केली गेली. निवडणूक अधिकारी, वैद्यकीय व अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या चमूने तिच्या निवासस्थानापासून ते मतदान केंद्रापर्यंत आणि परतीचा प्रवास अखंडपणे व विना अडचणीचा करण्यासाठी समन्वय साधला.
हे उदाहरण सर्व मतदारांसाठी सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना अधोरेखित करते. प्रत्येक नागरिक, त्याच्या शारीरिक स्थितीसह, लोकशाही प्रक्रियेत सुरळीतपणे व कुठल्याही अडचणीशिवाय सहभागी होऊ शकेल तसेच प्रत्येक मतदाराचा मतदानाचा अनुभव हा सुखद होईल हे सुनिश्चित करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट या उदाहरणांवरून सिद्ध होते.
या महिलेने सेवेबाबत समाधान व्यक्त करत निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार मानले.ज्यांना मतदान न करण्यासाठी विविध कारणे सापडतात अशांसाठी तिचा दृढनिश्चय एक प्रेरणादायी उदाहरण आहे. मतदान केंद्रावरील अनेक मतदारांनी तिच्या दृढनिश्चयाची आणि मा.निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांची आवर्जून प्रशंसा केली.
प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग” हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याकरिता यासारखी उदाहरणे कृतीशील उपाय, मतदारांचा अनुभव सुखद करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न, दृढनिश्चयी व्यक्ती आणि प्रबळ इच्छाशक्ती राष्ट्राच्या लोकशाही प्रक्रियेला कशा प्रकारे बळकटी देऊ शकतात याचे महत्त्व पटवून देते.