चिपळूण : मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषि महाविदद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या थेट मार्केटिंगसाठी मोफत कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत ‘मार्केट मिर्ची’ या मोबाइल अॅपद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना स्वउत्पादित आणि प्रक्रिया केलेल्या शेती उत्पादनांचे विस्तृत प्रमाणात बहुसंख्य ग्राहकापर्यंत पोहोचवणे सुलभ होईल, असे सांगण्यात आले. या अॅपच्या संचालिका प्रगती गोखले यांनी कृषिमधील डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व आणि भविष्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतातून आपला शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त नफा व वेळेची बचत कशी करता येईल यावर मार्गदर्शन केले. या अॅपचा वापर कसा करायचा याचे पूर्ण प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. जवळपास २६ प्रकारच्या शेतमालांची विक्री कशी करू शकतो, याचे एकदम सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीम. अय्यर, श्री. सबनीस, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, डॉ. पांडुरंग मोहिते, प्राध्यापक व विद्यार्थीही उपस्थित होते.