संगमेश्वर:- येथील व्यापारी पैसा फंड संस्था संचालित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे दिवाळीच्या सुटीत शुभेच्छापत्र तयार करणे आणि चित्र रेखाटनाचा उपक्रम राबवून बालकलाकारांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी १९७२ कलाकृती साकारून स्वतःमधील सुप्त गुणांना आकार दिला. याबरोबरच दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांनी २६३ शुभेच्छापत्रे तयार करून आपल्या आप्तांना अनोखा शुभसंदेशही दिला आहे.
कलेच्या माध्यमातून अर्थार्जन करता येते, हे विद्यार्थ्यांना अनुभवता यावे, हा दीपावली सुटीतील या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सुंदर कलाकृती पाहून पालकांनी त्यांच्या कलेचे कौतुक करावे, तसेच घरी येणाऱ्या आप्तांनी विद्यार्थ्यांची कला पाहून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी, हा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम कलाकृती साकारल्या. काही मुलांना त्यांच्या कलाकृतींचे कौतुक म्हणून पालक आणि आप्तांकडून बक्षीसदेखील मिळाले.
दिवाळीची सुटी केवळ मौजमजा करण्यासाठी नसून या सुटीतही आपण काहीतरी नवीन केले पाहिजे, या उद्देशाने पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कलाविषयक एक उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार निसर्गाकडे अथवा सजीव-निर्जीव अशा कोणत्याही वस्तूकडे पाहताना विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता वाढावी हा या उपक्रमाचा उद्देश होता. सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पाच चित्रे, तर नववी- दहावीमधील प्रत्येक विद्यार्थ्याने दहा चित्रे रेखाटण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
कोलाज चित्र हा विषय संयम शिकविणारा तसेच निरीक्षणशक्ती वाढविणारा असल्याने जाहिरातींचे, जुन्या कॅलेंडरचे अथवा साप्ताहिक – मासिकांमधील टाकाऊ रंगीत कागदाच्या तुकड्यांमधून कोणतेही कोलाज चित्र साकारावे यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले. आपला छंद जोपासण्यासाठी अथवा त्यामधून नवनवे अनुभव घेण्यासाठी सुटीचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रथम टाकाऊ रंगीत कागद शोधले आणि कागदांच्या उपलब्धतेनुसार अप्रतिम कलाकृती तयार केल्या. वर्तमानपत्राच्या कागदांचादेखील विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने वापर केला. सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दीपावलीच्या सुटीत एकूण १०५२, तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून ९२० कलाकृती तयार केल्या.
दिवाळीत फराळाचे विविध पदार्थ करून आई खूप दमते. आईसाठी दीपावलीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाने स्वतःच्या हस्तकौशल्यातून साकारलेले एक छानसे शुभेच्छापत्र द्यायचे आणि आईच्या चेहऱ्यावर तरळणारा आनंद अनुभवायचा, असा आणखी एक उपक्रम कला विभागाच्या वतीने पाचवी ते आठवीतील प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आला होता. त्यानुसार २६३ विद्यार्थ्यांनी आपल्या आईला स्वतः तयार केलेल्या शुभेच्छापत्रांमधून सर्वांगसुंदर शुभेच्छा दिल्या. आईलादेखील आपल्या पाल्याने स्वतः तयार केलेले शुभेच्छापत्र पाहून समाधान मिळाले.
दिवाळीची सुटी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी या सर्व कलाकृती प्रशालेच्या कला विभागाकडे विद्यार्थ्यांनी जमा केल्या. चित्राकृती तयार करताना आलेल्या विविध अनुभवांबाबत विद्यार्थ्यांनी कलेच्या तासाला आपली मते व्यक्त केली.
या कलाकृतींचा समावेश कला विभागातर्फे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रकाशित होणाऱ्या चोविसाव्या कलासाधना या चित्रकला वार्षिकात केला जाणार असल्याचे कला विभागातर्फे सांगण्यात आले. कला विभागाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक संस्था सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी केले.