गुहागर:-रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी काल झालेल्या मतदानाची जिल्ह्याची अंतिम सरासरी ६५.२३ टक्के आहे. विशेष म्हणजे यावेळी गुहागर मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची आकडेवारी अधिक असल्यामुळे खऱ्या अर्थाने तेथील निवडणुकीचे भवितव्य महिलांच्याच हाती आहे.
त्यांनी कोणाला निवडून दिले, हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत, सुरळित आणि उत्साहात झाले. गेल्या वेळच्या २०१९ च्या तुलनेत यावर्षी मतदानामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक ६९.०४ टक्के मतदान चिपळूण मतदारसंघात तर सर्वांत कमी ६१.७९ टक्के मतदान गुहागरमध्ये झाले आहे. मतदानामध्ये ४ लाख ४६ हजार ४७० महिला आणि ४ लाख २७ हजार ३६३ पुरुष तर, ४ इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रावर काल सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनामार्फत मतदारांसाठी मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, आरोग्य सुविधा आदींची सोय केली होती. मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक अधिकारी सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी ६१.२२ टक्के होती. तर, लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी ५९.७७ टक्के होती. गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी ५८.०३ टक्के होती. या तुलनेत काल झालेल्या मतदानात चार टक्क्यांची वाढ झाली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय काल झालेले मतदान असे –
दापोली – पुरुष ९४ हजार ९७९, महिला ९९ हजार ७१८. टक्केवारी ६६.८४.
गुहागर – पुरुष ७० हजार ५८३, महिला ७९ हजार ३७४. टक्केवारी ६१.७९.
चिपळूण – पुरुष ९५ हजार ८१६, महिला ९४ हजार ७७६. टक्केवारी ६९.०४.
रत्नागिरी – पुरुष ९० हजार ६५१, महिला ९४ हजार ९३८. इतर ४. टक्केवारी ६३.७३.
राजापूर – पुरुष ७५ हजार ३३४, महिला ७७ हजार ६६४. टक्केवारी ६४.१७.
जिल्ह्यातील ४ लाख २७ हजार ३६३ पुरुष तर ४ लाख ४६ हजार ४७० महिला व ४ इतर मतदार अशा एकूण ८ लाख ७३ हजार ८३७ मतदारांनी काल मतदान केले.
गुहागरमध्ये पुरुषांपेक्षा ८ हजार ७९१ अधिक महिलांनी मतदान केले. तेथे पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६१.११, तर महिलांची टक्केवारी ६२.४० टक्के आहे. तेथे पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने महिला मतदारांची संख्या अधिक असते. मतदानाची टक्केवारी महिलांपेक्षा पुरुषांचीच अधिक असते. म्हणजेच संख्या अधिक असली, तरी महिलांचे मतदान कमी होते. यावेळी गुहागरमध्ये त्याला अपवाद झाला आहे. पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी मतदान केले आहे. त्यामुळे तेथील संभाव्य विजेत्या उमेदवाराच्या विजयामध्ये महिलांचा वाटा अधिक असेल.