नवी दिल्ली:-कथित सौरऊर्जा कंत्राट लाच प्रकरणी उद्योगपती गौतम अदानी आणि इतरांवर अमेरिकेतील कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या अटकेची मागणी केली आहे.
दिल्तीच्या काँग्रेस कार्यालयात आज, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल बोलत होते.
याप्रकरणी राहुल म्हणाले की, हा मुद्दा संसदेत मांडणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून हा मुद्दा मांडण्याची जबाबदारी माझी आहे. या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशीची गरज असून गौतम अदानींना अटक केली जावी असे गांधी म्हणाले. परंतु, पंतप्रधान मोदी यांचे अदानींना संरक्षण मिळत असल्यामुळे अदानींना भारतात अटक होणार नसल्याचा टोला देखील राहुल यांनी लगावला. अदानीने भारतीय आणि अमेरिकन कायदा दोन्ही मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मला आश्चर्य वाटते की अदानी या देशात मुक्तपणे कसे काय फिरू शकतात. अदानीने उघडपणे 2 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. कदाचित इतरही अनेक घोटाळे केले आहेत, पण ते राजरोसपणे फिरत आहे. पंतप्रधान अदानींना संरक्षण देत आहेत आणि पंतप्रधान अदानीसोबत भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, असाही आरोप राहुल गांधींनी केला.