खेड:-विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेसाठी चाकरमानी मंगळवारी सायंकाळपासून खासगी वाहनांसह आराम बसद्वारे गावी डेरेदाखल झाले. महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने महामार्ग वाहतूक कोंडीत अडकला. यामुळे प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागला.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने महामार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयासह वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. इंदापूर, माणगाव, महाडनजीक चौपदरीकरणातील सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यात मंगळवारी सायंकाळपासून महामार्गावर वाढलेल्या बेसुमार संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला. बुधवारी मतदान प्रक्रियेसाठी चाकरमानी खासगी वाहनासह आराम बसद्वारे गावी डेरेदाखल झाले. पेण, कोलाड, माणगाव, इंदापूर दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला सामोरे जावे लागले. वाहतूक सुरळीत करताना महामार्गावर तैनात वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. येथील पोलिसांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावी आलेल्या प्रत्येक वाहनांवर करडी नजर ठेवत वाहनांची कसून तपासणी केली.