राजापूर:-राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या 9 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून राजापूर विधानसभा मतदार संघात सुमारे 65 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी चांगली म्हणजे सुमारे 25 टक्के होती. मात्र त्यानंतरही मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याने सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65 टक्के एवढे मतदान झाले होते. गतवेळेच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानासाठी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे.
राजापूर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांच्यासह अपक्ष म्हणून अविनाश लाड, अमृत तांबडे, संदीप जाधव, यशवंत हर्याण, राजेंद्र साळवी, संजय यादव असे एकूण 8 उमेदवार निवडणूक रिंगणात असून या सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवारी इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले.
राजापूर-लांजा-साखरपा या विधानसभा मतदार संघातून 1 लाख 24 हजार 570 महिला आणि 1 लाख 13 हजार 839 पुरूष असे सुमारे 2 लाख 38 हजार 409 मतदार आहेत.
बुधवारी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील सुमारे 345 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या सत्रात मतदारांकडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी 7 वा. मतदानाला सुरूवात झाली. सुरूवातीला मतदानाचा वेग काहीसा कमी होता. त्यानंतर मात्र मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 25 टक्के मतदान झाले. त्यानंतरही मतदानासाठी चांगला प्रतिसाद लाभला. दुपारच्या सत्रात मात्र मतदार केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. तरीही दुपारी 3 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले होते. पुन्हा सायंकाळी मतदारांना मतदानासाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. विधानसभा मतदार संघात सर्वत्र सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 61 टक्के मतदान झाले होते.