मुंबई:-दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्वेच्या पठाण वाडीत शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी ठाकरे गटाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे.
संजय निरुपम यांच्या मते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांना जबरदस्तीने UBT शिवसेनेला मत देण्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला असता, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम यांनी सांगितले की, घटनेवेळी मुस्लिम समाजातील उबाठाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते, हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. हा प्रकार समोर आल्यावर पोलीस घटनास्थळी आले, परंतु योग्य कारवाई झाली नाही. पोलिसांनी कारवाई न केल्यास थेट पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन देणार आहे.
दिंडोशी मतदारसंघात सध्या शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट यांच्यात तीव्र राजकीय स्पर्धा आहे. ठाकरे गटाचे विद्यमान आमदार सुनील प्रभू मागील दोन टर्मपासून निवडून येत असून, हॅट्ट्रिकसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक मतदारांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात संजय निरुपम यांच्यामुळे ठाकरे गटाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.