मुंबई:-महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढले असले तरी थंडीचा कडाका राज्यात जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीने जोर धरला असून, निफाडमध्ये राज्यातील सर्वात कमी ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागानुसार पुढील २४ तासांत तापमानात अधिक घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य मावळल्यानंतर थंडीचा कडाका अधिक तीव्र होत असून शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकणातील घाट क्षेत्रांत पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील, तर काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा गारठा जाणवणार नसल्याने तापमान स्थिर राहील. देशाच्या उत्तरेकडून हिमालयीन पर्वतरांगेवरून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील थंडी वाढली आहे. तामिळनाडूपर्यंत पोहोचलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिण भारतातही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. राज्यातील गारठा विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरही परिणाम करू शकतो. सकाळी थंडी जाणवणार असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांची तयारी ठेवावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.