रत्नागिरी:-गेले दोन दिवस किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारीपट्टी भागात गारठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.त्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि मळभी वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री गारठा जाणवू लागला आहे. त्यामुळे आंब्यासह काजू बागायतदारांनी हंगामाची जुळवाजुळव सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यात सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत होते. त्यात थंडी न पडल्याने आंबा हंगाम लांबण्याचीही भीती होती; मात्र सोमवारपासून थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. सकाळी आणि रात्री हलका गारठा पडू लागला आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि दिवाळीतही पाऊस पडत होता. कार्तिक पौर्णिमेलाही पाऊस पडल्याने थंडी सुरू झाली नव्हती. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही असह्य उकाडा होत होता. हे मळभी वातावरण निवळले असून, गारठा जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात पहाटे २८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सकाळी ते अर्ध्या अंशाने वाढले होते. दुपारी मात्र तापमान ३० अंशांवर होते. देवदिवाळी जवळ आल्याने जोरदार वारे सुटल्याने गारठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.