रत्नागिरी:-जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतील रोपांची लागवड आता पावसाळा संपल्यानंतर कागदावरच झाली असल्याचे पुढे येत आहे. या मोहिमेंतर्गत लावण्यात आलेली झाडे जागेवर दिसून येत नाहीत. मात्र, ग्रामस्थांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने रोपांचे संगोपन व देखभाल दाखवल्याचे समोर आले आहे.
वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे लाखो रुपये खर्च करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे या लागवडीकडे फारसे लक्ष देण्याची गरज नव्हती. मात्र आता पाऊस गायब झाल्यानंतर लागवड केलेली ही रोपे जागेवरच नसल्याचे निदर्शनास आले आहे. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने ही मोहीम केवळ कागदावर राबवली जात आहे.
मोहिमेंतर्गत झाडे लावण्यातही येत नाहीत किंवा ती जगवली जात नाहीत. मात्र, झाडांना (रोपांना) पाणी घालणे, कुंपण करणे, मातीची भर करणे यासारखी विविध कामे दाखवून लाखो रुपयांचा खर्च दाखवला जात आहे. ही योजना राबवण्यासाठी ग्रामस्थांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने रोपांचे संगोपन व देखभाल करत असल्याचे भासवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ज्यांच्या नावे ही कामे नोंदवलेली आहेत. ती माणसेही जागेवर नाहीत.
स्थानिक कर्मचारी व गावातील नेते यांच्या संगनमताने ही लागवड प्रत्यक्षात करण्यात आली नसल्याने आता या मोहिमेतील प्रत्यक्षात लागवड न झालेल्या रोपांच्या मुळाशी बरेच पाणी मुरत असल्याची प्रतिक्रिया वृक्षप्रेमींकडून व्यक्त होत आहे.