रत्नागिरी : कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागात वणवे लावण्याचे प्रकार सुरू आहेत. वन विभागासह प्रशासनाने वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असतानाही वणवे लावण्याचे प्रकार आता सुरू होतील त्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकरी आणि बागायतदार यांच्याकडून होत आहे.
सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या पर्वत रांगामध्ये कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या भागात पाऊस ओसरल्यानंतर अनावश्यक रान काढण्याच्या नावाखाली वणवे लावण्याचे प्रकार घडत असतात. या डोंगराळ परिसरात असलेल्या गवतावर वणवे लावून डोंगर उजाड केले जातात. वणव्यामुळे परिसरातील अनेक झाडे प्रामुख्याने आंबा, कोकम, करवंदाच्या जाळ्या, जांभूळ अशी फळझाडे वणव्यात जळून नुकसान होते. काही शेतकऱ्यांनी फळ बागायती वृक्ष लागवड केली आहे. वणव्यामुळे या बागायतींना फटका बसतो. बागायतदार शेतकऱ्यांचे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते. बागायतीमधील आंबा, काजू, कोकम आदी फळझाडांच्या बागायती होरपळून जातात. त्यामुळे या बागायतदाराच्या अडचणी वाढतात.
गुरांना पावसाळी हंगामात चांगला चारा मिळावा याकरिता वणवे लावले जात असल्याचे सांगितले जाते. वणव्यामुळे कोकणची निसर्गसंपदा व फळ बागायतींची राख होत आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बागायतदार आणि शेतकरी करत आहेत.