काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा भाजपचा आरोप
नागपूर :विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षितरित्या नेण्याचे काम पोलिसांकडून होत होते. मात्र याच वेळी नागपुरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर अज्ञातांनी हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे.
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुध क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. जेव्हा किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम घेऊन जाणारी तवेरा गाडी मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यावेळी परिसरातील दक्ष नागरिक आणि काही एका भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांना बोलावले. मात्र तोवर दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला करत इव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या तवेरा गाडीची जबर मोडतोड करण्यात आली होती.
पोलिसांनी माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेत ईव्हीएम तसेच तवेरा गाडीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर ईव्हीएम मशीन आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवले आहे..
या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनकडे धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना तिथून हुसकावून लावले.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती नुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या या गाडीची तोडफोड केली आहे असे म्हटले आहे.