मकरंद सुर्वे / संगमेश्वर
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रांवर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या दरम्यान कोळंबे, डिंगणी, वांद्री, आंबेड आदी भागातील मतदान केंद्रात गर्दी पहायला मिळाली. मात्र सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्र वगळता अनेक केंद्रात मतदान करण्यासाठी फारसी गर्दी नव्हती. सकाळच्या दरम्यान काहीं शेतकऱ्यांनी मतदान केंद्रात रांगा लावत मतदानाचा हक्क बजावला तर काही शेतकऱ्यांनी मतदानानंतर शेतात जाणे पसंत केले. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिसांनी योग्य नियोजन करत शांततेत मतदान पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पोलीस निरीक्षक यादव हे स्वतः बूथ निहाय चौकशी करत होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत असून कोकणातील मतदारसंघातील उमेदवाराला विजयी करण्यासाठी चाकरमान्यांची कोकणात मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. थेट मुंबई वरून सकाळी ३.०० वाजल्यापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांबच लांब एक ते दोन किलोमीटरच्या रांगाच रांगा पहावयास मिळत होत्या. तसेच रस्त्यालगतचे हॉटेल, ढाबे, सी. एन. जी. पेट्रोल पंप हे तर चाकरमान्यांच्या गर्दीने अक्षरशः गजबजून गेले आहेत. गणेश उत्सव, होळी सणाप्रमाणे या विधानसभा निवडणुकीला मुंबई चाकरमानी खाजगी बस, छोटी-मोठी वाहने घेऊन ते आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करून विजयी करण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहेत.