खेड : कोकण मार्गावर पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने आठवडयातून दोनवेळा चालवण्यात येत असलेल्या बांद्रा-मडगाव साप्ताहिक गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी संख्या रोडावली आहे. कोकण मार्गावरील महत्वाच्या स्थानकांवरील थांबे वगळण्यात आल्याचा मोठा फटका रेल्वे प्रशासनाला बसत आहे. खेड स्थानकातही थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे प्रवासी संख्या घटली असून कोकण मार्गावर महत्वाच्या स्थानकांवर थांबे द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात धावणारी एकही गाडी नव्हती. कोकणवासियांना गाव गाठण्यासाठी सीएसएमटी-मुंबई किंवा दादर स्थानकांचा आधार घ्यावा लागत होता. विशेषत सणांच्या कालावधीत कोकणवासियांना यातायात करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर पश्चिम मार्गावरून कोकण मार्गावर गाडी चालवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. सततच्या पाठपुराव्यानंतर 29 ऑगस्टपासून बांद्रा-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी चालवण्यास रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दिला. त्यानुसार कोकण मार्गावर पश्चिम मार्गावर वसईमार्गे धावणारी बांद्रा-मडगाव गाडी बांद्रा येथून सकाळी 6.50 वाजता सुटते. तब्बल 12 तास 10 मिनिटे इतका अवधी घेऊन सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी येथे पोहोचते. जवळपास एवढया अंतराच्या प्रवासासाठी सकाळी 7.10 वाजता सीएसएमटी मुंबईवरून सुटणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसचा सावंतवाडी येथील वेळ सायंकाळी 4 वाजून 28 मिनिटे असा आहे. म्हणजेच या प्रवासाला मांडवी एक्स्प्रेस 9 तास 18 मिनिटे इतका अवधी घेते.
बांद्रा-मडगाव गाडीला कोकण मार्गावर मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवात गाडीच्या क्षमतेपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक प्रवासांनी प्रवासही केला. सद्यस्थितीत प्रवासी संख्या पुरती घटली आहे. प्रवासी संख्या 70 ते 78 टक्के वर येवून ठेपल्याचे समजते. कोकण रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून बदललेल्या बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाडीच्या वेळेतही बदल केलेला नाही. यामुळे प्रवाशांचा हिरमोडच झाला आहे. या गाडीला प्रवाशांना उदंड प्रतिसाद लाभेल, अशी वर्तवण्यात आलेली शक्यता फोल ठरली आहे.
बांद्रा-मडगाव साप्ताहिक कोकण मार्गावर धावू लागताच प्रवाशांनी सुरुवातीला भरभरून पसंती दिली होती. मात्र कोकण मार्गावर महत्त्वाच्या स्थानकावर वगळण्यात आलेल्या थांब्यांमुळे अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खेड स्थानकात देखील थांबा वगळण्यात आला आहे. वास्तविक येथील स्थानकात खेडसह मंडणगड, दापोली तालुक्यातील प्रवाशांची सतत वर्दळ सुरू असते. गजबजलेले स्थानक असतानाही येथील स्थानकात थांबा वगळून एकप्रकारे प्रवाशांवर अन्याय केल्याचा सूर आळवला जात आहे. या गाडीला येथील स्थानकात थांबा द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. खेडसह कोकण मार्गावरील अन्य महत्त्वाच्या स्थानकात देखील थांबे देवून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर महत्त्वाच्या स्थानकावर थांबा देण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालावे, असा आग्रही करण्यात येत आहे.