रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन युवकांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही तरुण माथेरान येथील असून साजगाव यात्रेतुन मोटरसायकलने परत येत असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशीपासून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात साजगाव यात्रेला सुरुवात झाली आहे. बोंबल्या विठोबाचे दर्शन आणि यात्रा असा दुहेरी आनंद घ्यायला भाविकांची गर्दी होते. सोमवारी रात्री माथेरानमधून सहा तरुण दोन दुचाकी घेऊन यात्रेला आले होते. साजगाव यात्रेवरून ते पुन्हा माथेरानला परतत असताना त्यांचा महड फाट्याच्या पुढे समोरील उभ्या असलेल्या टेम्पोला त्यांच्या एका दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की अजय आखाडे (१८) आणि दर्शन वेताळ (१६) यांचा मृत्यू झाला. तर प्रथमेश सोनवणे (१७) हा युवक जबर जखमी झाला आहे. याच्यावर उपचार सुरू आहेत. तिन्ही जखमी युवकांना तात्काळ कळंबोली मधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दर्शन वेताळ याचा जागेवरच मृत्यू झाला तर पहाटेच्या सुमारास अजय आखाडे याने शेवटचा श्वास घेतला.
या दुर्घटनेमुळे माथेरानमध्ये शोककळा पसरली आहे. या दोन्ही युवकांना श्रद्धांजली म्हणून मंगळवारी व्यापारी मंडळाने दुकाने बंद ठेवली होती, तर अश्वपाल संघटनेकडून घोडे देखील बंद ठेवले होते. संध्याकाळी सहा वाजता माथेरानमधील वैकुंठ धाम येथे दोघांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले.