जिल्हा आंबा उत्पादक संघ अध्यक्ष प्रदीप सावंत
रत्नागिरी : आंबा उत्पादक शेतकऱ्यांची जिल्हा संघटना ही पक्ष विरहीत असून, कोकण संघाचे उपाध्यक्ष असलेल्या प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना विश्वासात न घेता पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत. सरकार कोणाचेही असले तरी शेतकऱ्यांसाठी आपल्याला मागण्या घेऊन जावे लागते. त्यामुळे साळवी यांनी राजकारण आणू नये असा टोला रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांनी लगावला आहे.
या पत्रकार परिषदेला रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, सुनील नावले, किरण भाटकर, केदार पटवर्धन उपस्थित होते. कोरोनापासून आतापर्यंत अनेक प्रश्न सोडवण्यासाठी उदय सामंत यांनी मंत्री म्हणून प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी सांगितले. निव्वळ आंबा बागायतदारांचे प्रश्न आणि त्यांना जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी ही संघटना काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बावा साळवी यांनी वैयक्तिक आकसापोटी हे आरोप केले असावेत असेही सुनील नावले यांनी सांगितले. कोरोना काळात लॉकडाऊनवेळी आंबा पिक काढण्याचा व विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी उदय सामंत यांनी पुढाकार घेऊ आंबा काढणीची परवानगी घेऊन दिली. कामगारांना ने आण करण्यासाठी परवानग्या देण्यास सहाय्य केले. महाराष्ट्रात आंबा विक्रीसाठी परवानग्या मिळवून दिल्या. सामंत यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री, कृषीमंत्री व सहकार मंत्र्यांची एकत्रित बैठक लावली. सरसकट व्याजमाफी देण्याचे परिपत्रक काढण्यात पुढाकार घेतला. शेतीसाठी आवश्यक गाडयाना सबसिडी मिळावी म्हणून प्रयत्न केल्याचे उपस्थित आंबा बागायतदारांनी सांगितले.