रत्नागिरीे : विधानसभा निवडणुकीत मतदनाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक आस्थापना, समूहांनी पुढाकार घेतला असताना आता वैयक्तिक स्तरावरही मतदाना हक्क प्रत्येक नागरिकांनी बजावावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. मिरजोळे हनुमान नगर येथील हर्षवर्धन बने यांनीही आपल्या चित्राकृतीतून मतदनाचा हक्क बजावण्याचा आग्रह करताना त्यांनी घरा समोरिल भिंतीवर आकर्षक चित्र प्रबोधनासाठी आणि आवाहनासाठी चितारलेले आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण मतदान होत आहे. नागरिकांना मतदानासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर झाली आहे. तसेच, शनिवार, रविवार या साप्ताहिक सुटीला सलग जोडून पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून मतदानासाठी बुधवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत. असाच एक उपक्रम मिरजोळे येथील हर्षवर्धन बने यांनी राबविला आहे. याआधी बने यांनी दिवाळीत रांगोळीतून विविध प्रबोधनात्मक आणि सजग करणार्या रांगोळ्या साकारल्या होत्या. आता त्यांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन चित्रातून केले आहे. ही चित्राकृती साकरण्यासाठी परिसरातील तेजस शितप, मिरा शिंदे यांनीही सहकार्य केले आहे. हर्षवर्धन बने हे येथील एमआयडीसीतील एका कंपनीचे कर्मचारी असून त्यांनी चित्र, रांगोळी आदी कलांच्या छंदातून विविध उपक्रमामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असतात.