लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीची अनोखी योजना
रत्नागिरी:-उद्या होणाऱ्या मतदानासाठी आपल्या सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावयाचा आहे. यासाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एक अनोखी योजना राबविण्यात येत आहे. डोळसपणे मतदान करा आणि मोफत डोळ्यांचे उपचार व शस्त्रक्रिया स्वीकारा असे आवाहन लायन्स क्लब रत्नागिरी यांनी केले आहे.
मतदान करणे हा एक नागरी संस्कार आहे. आपल्या सर्व मतदारांच्या मतांवरच या देशाची लोकशाही अवलंबून असते. आपण केलेल्या मतदानानेच योग्य व्यक्ती या प्रशासनामध्ये काम करू शकतात. परंतु यासाठीच आपण सर्वांनी एक सुजाण नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क हा १००% बजावायला हवा. जे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्या मतदारांसाठी डोळ्याचे ऊपचार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया (SICS) लायन्स आय हॉस्पिटल, एमआयडीसी येथे मोफत करण्यात येणार आहे. मतदान वाढविण्याच्या दृष्टिने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीसाठी ही योजना सुरू असणार आहे. तरी रत्नागिरी विधानसभेतील मतदारांनी मतदान करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष MJF लायन डाॅ.संतोष बेडेकर यांनी केले आहे.