चिपळूण-चिपळूण विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे.मंगळवारी (ता. १९) सकाळी ७ वाजल्यापासून मतदान यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रांवर पाठवण्यात येणार आहेत. एकूण ३३६ मतदान केंद्रांपैकी चिपळुणात १७० तर संगमेश्वर तालुक्यातील १६६ मतदान केंद्रांवर यंत्रे रवाना होतील. चिपळुणातील ११९ तर संगमेश्वरमधील ४५ मतदान केंद्रे सीसीटीव्हीच्या कक्षेत असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
येथील प्रांताधिकारी कार्यालयात काल सायंकाळी पत्रकार परिषद झाली. या वेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते. प्रांताधिकारी लिगाडे म्हणाले, चिपळूण विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ७६ हजार ६५ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३४ हजार ८१३ पुरुष तर १ लाख ४१ हजार १८३ महिला मतदार असून, ८५ वर्षांवरील ३ हजार ८१८ तर दिव्यांग १ हजार ७०३ मतदार आहेत. या वेळी ५ हजार १७ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. चिपळूण मतदार संघातील ३६ मतदान केंद्रांवर कोणतेच मोबाईल नेटवर्क नाही. १६८ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत ८३५ पैकी ७८६ लोकांचे होम व्होटिंग घेण्यात आले आहे. ३३६ मतदान केंद्रांवर ३३६ पोलिस व तेवढेच होमगार्ड असणार आहेत तर प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच कर्मचाऱ्यांच्या ३६४ टीम बनवण्यात आल्या आहेत.
मतदार संघात ९५.५७ टक्के व्होटर्स स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित लोकांना त्या लवकरच देण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सर्व मतपेट्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आणण्यात येतील. त्या ठिकाणी २१ टेबल लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मतदान यंत्र जमा केली जातील. रात्री १० वा. पर्यंत सर्व मतपेट्या दाखल होतील. त्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवून स्ट्राँग रूम सील केले जाईल. मतदान यंत्रणा निर्भय व सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून चोख तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लिगाडे यांनी केले आहे.