सतत सर्व्हर डाउनमुळे बँकिंग सेवेत अडथळा
मंडणगड:-तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या इंटरनेटमुळे शहरातील सर्वच बँकांची सिस्टिम तासनतास ठप्प होत असल्याने लाडक्या बहिणींसह तालुकावासीयांचे मोठे हाल होत आहेत.
ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना सेवा मिळत नसल्याने प्रचंड नाराजी असून आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.
शहरातील सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँका बदलत्या काळात इंटरनेटवर अवलंबून आहेत; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात इंटरनेट सेवा बंद पडून बँकाचे कामकाज ठप्प राहण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. गेल्या चार वर्षापासून आठवड्याचे शेवटचे तीन दिवस बँकांची एटीएम सेवा ठप्प राहण्याची समस्या होतीच. त्यात आता नेट बंद असण्याच्या समस्येची नव्याने भर पडली आहे. पैशाकरिता व अन्य व्यवहारसाठी बँकेत जाणाऱ्या लाडक्या बहिणींना रांगेत तासनतास उभे राहावे लागत आहे. अधिकारी महिलांना नेट नाही, तुमचे काम दोन महिन्यांनी होईल, अशी उत्तरे बेधडक देत आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळलेल्या अनेक महिलांना बँकिंग प्रणालीतील अडचणीमुळे आजही लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
ठप्प कामकाजामुळे अन्य ग्राहकांचेही तेच हाल होत आहेत. जबाबदारीचे भान नसलेले बँकर व तालुक्यात नेट सेवा देणाऱ्या कंपन्या यापैकी या परिस्थितीस जबाबदार घटकाने आपली जबाबदार असणाऱ्या घटकांना वारंवार नेट खंडित होणार नाही याकरिता उपाययोजना कऱण्याची आवश्यकता समस्याग्रस्त नागरिकांमधून केली जात आहे.