कणकवली:-असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमात तुलसी विवाहाचा आगळा वेगळा शाही थाटात कार्यक्रम संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी साजरा केला.
वृद्धाश्रमातील आजीआजोबांना लग्न सोहळ्याचा आनंद घेता यावा आणि ज्या आजोबांचे तरुणपणात लग्न झाले नाही अशा आजोबांना आपल्या उतारवयात लग्न सोहळ्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी हा सोहळा दरवर्षी थाटात साजरा केला जातो. पारंपरिक सर्व विधी यावेळी केले जातात.
दिविजा वृद्धाश्रमातील आजोबा पांडुरंग (वय ६५) अविवाहित असल्याने त्यांना लग्न सोहळ्याचा आनंद देण्यासाठी बोहल्यावर उभे केले गेले. तत्पूर्वी तांदुळ निवडण्याचा पारंपरिक कार्यक्रम आश्रमातील सातोसे आजी, विजया आजी यांच्या सुस्वर आवाजात ओव्या म्हणत पार पडला. आश्रमातील कर्मचारी प्रतीक्षा सावंत यांनी त्यांना ओव्या म्हणण्यास साथ दिली. तांदुळ निवडून झाल्यानंतर आश्रमातील सर्व आजीआजोबांनी पांडुरंग आजोबांना हळद चढवली सर्व आजी व कर्मचाऱ्यांना पिवळ्या साड्या नेसवून हळदीचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला.
पिवळ्या साड्यांनी आश्रमातील वातावरण पूर्णत: हळदमय झाले होते. हळद झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी व आजीआजोबांनी हळदीच्या गाण्यावर नृत्य चालू केले. आजी रोहिता व शुभांगी यांनी तर हळद लागली या गाण्यावर एकच ठेका धरला. आजोबांची करवली म्हणून महिला कर्मचारी कुमारी सायली तांबे हिने आजोबांसाठी करा धरला तर सौ अस्मि हिने तळी धरली. श्री पांडुरंग आजोबा यांना नटून थटून कार्यक्रम मंडपात आणले गेले. त्यानंतर पुण्याहवाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आश्रमातील महिला कर्मचारी श्री. व सौ. अनुजा आचरेकर यांनी आजोबांचे हे कार्य केले. या कार्याला नवऱ्याचा धेडा म्हणून गोपीनाथ यांनी भूमिका बजावली.
श्री. शंतनू गुरुजींनी गणेशपूजन करून पुण्याहवाचन सुरू केले. सर्व आजींनी घाणे भरण्याचा कार्यक्रम व कर्मचाऱ्यांनी आहेर देण्याचा कार्यक्रम केला. कर्मचारी सौ. दीप्ती, मंजिरी, सुनीता, अर्चना, प्रमिला, कु. अश्विनी यांनी वरास आहेर केला. नंतर मुहूर्ताची वेळ जवळ आली होती. आश्रमातील कर्मचारी श्री. कोकरे व श्री. समीर यांनी आजोबांच्या कपड्यांची तयारी व मेकअप करून तरुणासारखे त्यांना मांडवात आणले. नंतर तुलसीमायची करवली म्हणून कुमारी अश्विनी हिने नवरदेवाला रुखवत देऊन स्वत:चा मान घेतला. आश्रमातील कर्मचारी सौ. सानिया यांनी तळी ओवाळून औक्षण केले. मानाने पाय धुऊन वाजत गाजत नवरदेवास मांडवात आणले. खऱ्याखुऱ्या लग्नासारखा मांडव श्री महादेव व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने उभा केला होता. तुलसीला नववधूसारखी हिरव्या साडीने नटवली होती. सनईचौघडे घणघणत होते.
सायंकाळी शंतनू गुरुजींनी मंगलाष्टकांना सुरुवात केली. आश्रमातील महिला कर्मचारी सौ. भारती यांनी सुस्वर आवाजात मंगलाष्टकांना सुरुवात केली. भारतीचा उत्साह पाहून आश्रमातील आजी शोभना, चंपा, बेबी, वनिता यांनीही सुर धरला. अखेरची मंगलाष्टक श्री. समीर यांनी गायिले व शुभमंगल सावधान होताच सनईचौघड्यांचे सुर दुमदुमले. सर्व आजीआजोबांनी अक्षता टाकून नवदामपत्यास शुभाशीर्वाद दिले. कुरमुरे व उसाची उधळण करून प्रसाद म्हणून कुरमुऱ्याचे वाटप करण्यात आले. अगदी खऱ्याखुऱ्या लग्न सोहळ्याप्रमाणे हा तुलसी विवाह दिविजा वृद्धाश्रमात पार पाडला.
आश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी सांगितले की, एवढ्या सगळ्या शारीरिकदृष्ट्या थकलेल्या आजीआजोबांना प्रत्यक्ष लग्न सोहळ्याला नेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना वर्षातून एकदा लग्न सोहळ्याचा आनंद घेता यावा याकरिता तुलसी विवाहाचे औचित्य साधून दिविजा वृद्धाश्रमात एक आगळा वेगळा लग्न सोहळा साजरा केला जातो.
या सोहळ्याकरिता संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये, अविनाश फाटक, सौ. साधना तेलतुंबडे, श्रीमती संध्या गायकवाड, सौ. योजना परब, किरण नारायणकर, संजय ढवण ही मंडळी मुंबईहून खास हजर झाली होती.