रत्नागिरी: सेवा सहकारी सोसायट्यांना उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे डबघाईला आल्या आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने १५० वस्तू व सेवा देण्यास सवलत दिली आहे. यामध्ये संस्थांना बियाणे व खतविक्रीचा परवाना देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सेवा सोसायट्यांना कर्जवाटपाच्या माध्यमातून मिळणारे कमिशन वगळता सोसायट्यांकडे उत्पन्नाचा कोणातही स्रोत नाही. त्यामुळे या संस्थांचे आर्थिक बळकटीकरण व्हावे व त्यांना विक्री व्यवस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा, विविध वस्तू व सेवांची सुविधा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी ज्या सोसायट्या संलग्न आहेत त्याच विकास सोसायट्यांना ही सुविधा मिळणार आहे; मात्र याबाबत सोसायट्यांना ठराव घेऊन प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्यानंतर परवाना मिळणार आहे.
जिल्हा बॅंकेशी सलग्न असलेल्या सोसायट्यांना शेतकऱ्यांना पिककर्ज वितरणासोबत किरकोळ खतविक्री करता येणार आहे. यामुळे विकास सोसायट्यांचे सक्षमीकरण होणार आहे व शेतकऱ्यांची फसवणूकही टळणार आहे. भारतीय बीज निगमसह अन्य बियाणे संस्थांचा बियाणे व रासायनिक खतांची विक्री करण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्यांना परवाना मिळत आहे. यासाठी आवश्यक सुविधा शासनाकडून मिळणार आहेत. विकास सोसायट्यांना खत व बियाणे विक्रीचा परवाना मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वितरणासह निविष्ठांची विक्री करता येणार आहे. यामुळे संस्थेचे आर्थिक बळकटीकरण होणार आहे.