रत्नागिरी:-विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आता दोन दिवसांवर येवुन ठेपले आहे. याआधी निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी विविध ठिकाणी मतदान सुविधा केंद्राची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 266-रत्नागिरी मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सुविधा केंद्राचा या प्रशासकीय कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी लाभ घेत मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभा निवडणूकीसाठी 9 हजार 143 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आपला निवडणूकीचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. असेच सुविधा मतदान केंद्र रत्नागिरी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातही सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी आज पोलिस मुख्यालयासह सर्व ठिकाणी असलेले बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलिस कर्मचारी यांनी आज आवर्जुन मतदानाचा हक्क बजावला. आज या सुविधा केंद्रात रत्नागिरी पोलिस उपअधीक्षक निलेश माईणकर तसेच उपअधीक्षक गृह राधिका फडके यांनी आपला टपाली मतदानाचा हक्क बजावला.