मतदान ठिकाणी चक्कर येऊन पडल्यास लगेच होणार उपचार
रत्नागिरी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील 1747 बूथ वर दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. हिवाळा ऋतू असूनही दिवसा कडक उन्हाची जास्त असणारी तीव्रता लक्षात घेता त्या अनुषंगाने निवडणुकीसाठी सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या सुचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली 1747 बूथ वर प्रथमोपचार किट ठेवण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारांना मिळणार त्वरित उपचार
चक्कर, अशक्तपणा, अस्वस्थ वाटणे , ताप, डोके, अंग दुखी, जुलाब, पित्त,मळमळ, उलटी व जखम साठी औषधे असून आरोग्य विषयक तातडीच्या उपचारासाठी व संदर्भ सेवेसाठी 108 व 102 रुग्णवाहीका असून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.तसेच सर्व मतदान केंद्रावर पुरेशा औषध किटसह मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ अनिरुद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद रत्नागिरी