दापोली : अरबी समुद्रात महिन्याभरापासून मासळी कमी मिळत असल्याने 100 ते 150 बोटी दुरूस्ती, रंगकाम व इतर तांत्रिक कामांसाठी किनाऱ्यावर आल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.
मासेमारीला प्रारंभ झाल्यापासून आजतागायत सलगरित्या मासेमारीला सुरूवात झालेली नाही. प्रारंभाचा मासेमारीचा मुहूर्त हुकला होता. त्यामुळे उशिराने बोटी समुद्रात मासेमारीला गेल्या. मात्र त्यानंतर वादळसदृश परिस्थिती सण, उत्सवांमुळे बोटी पुन्हा-पुन्हा किनाऱ्यावर येत होत्या. तर आता पाऊस गेल्यानंतर बोटी समुद्रात मासेमारीला गेल्या. मात्र आता समुद्रात मासळी मिळत नसल्याने अनेक बोटी परत किनाऱ्यावर बोलावून घेतल्या आहेत. 8 दिवस मासेमारी करून योग्य ती मासळी मिळत नाही. या मिळालेल्या मासळीत डिझेलचा खर्चही सुटत नाही. त्यामुळे बोटींना रंगकाम व इतर तांत्रिक कामे करण्यासाठी किनाऱ्यावर आणल्या जात असल्याचे हर्णै येथील मच्छीमारांनी सांगितले.
दापोली तालुक्यातील 800 ते 900 बोटी मासेमारी करतात. मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे मासेमारीत अडचणी येत आहेत. यामुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडत आहे. पर्ससीननेट, एलईडीवाले मोठया प्रमाणात मासळी पळवत असल्याने पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना मासे पकडण्यासाठी अडचण निर्माण होते.