संगमेश्वर : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील निढळेवाडी येथे शनिवारी सायंकाळी चारचाकी कार चालकाने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने रिक्षा चालक अस्लम सुलेमान बोट यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची पत्नी शबाना अस्लम बोट यांना दुखापत झाली होती. तर 10 वर्षाची नात किरकोळ जखमी झाली होती. अहाना अतिश नेवरेकर ( 10 वर्षे) असे तिचे नाव आहे. या अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. पोलिसांनी कार चालकाचा शोध घेतला असून तो परचुरी येथील असल्याचे समजले. रुपेश विजय लिंगायत ( 26 राहणार परचुरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.
संगमेश्वर कळंबस्ते येथे अस्लम बोट हे शनिवारी दरग्याचा उर्स असल्याने रत्नागिरीतून पत्नी शबाना बोट व नातीला घेऊन संगमेश्वरला गेले होते. संध्याकाळी रत्नागिरीकडे जाताना रुपेश लिंगायत याने आपल्या ताब्यातील कारने पाठीमागून धडक दिली. धडक दिल्याने रिक्षा रस्ता सोडून थेट दरडीवर कलंडली. या अपघातात अस्लम सुलेमान बोट यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी शबाना यांच्या डोक्याला जबर मार लागला. तर नात अहाना अतिश नेवरेकर ही किरकोळ जखमी झाली आहे. अपघात झाल्यानंतर रिक्षातील अस्लम बोट व त्यांच्या पत्नी यांना ॲब्युलन्सने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यापूर्वीच अस्लम बोट यांचे निधन झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी काही वेळातच सर्वत्र पसरली आणि संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात अनेकांनी गर्दी केली.
अपघाताचे वृत्त समजल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव पोलीस नागरगोजे, शांताराम पंदेरे, म्हैसकर, करपे , बापू कोंदल, शेलार आदींसह घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करण्यात आल्यानंतर कारचालक रुपेश लिंगायत याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शेलार करीत आहेत.