गुहागर:-कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण करतो आहोत. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गुहागर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी शृंगारतळी (ता.गुहागर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार आणि शिवसेना उपनेते उदय सामंत, माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय नातू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले, कोकण हे शिवसेनेचे हृदय, श्वास आणि अभिमान आहे. मी स्वतःला सीएम नव्हे, तर कॉमन मॅन (सर्वसामान्य माणूस) समजतो. राज्यातील सर्वसामान्यांना ताकद देऊन मला त्यांना सुपरमॅन बनवायचे आहे. गुहागरमधल्या मतदारांनी भाकरी फिरवायची वेळ आली आहे. कारण भाकरी करपली आहे. मिमिक्री करणारा आणि भाषणे करणारा नव्हे, तर काम करणारा आणि विकास करणारा आमदार येथे पाहिजे. राज्यात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आमचे सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. देशातल्या परकीय गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. नातू यांच्या सहकार्यामुळे राजेश बेंडल गुहागरचे नगराध्यक्ष झाले होते. आता बेंडल यांना आमदार करण्याची संधी त्यांच्याकडे आहे, असेही शिंदे म्हणाले.
शेती, आरोग्य, रोजगार यांसह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे उमेदवार राजेश बेंडल यांनी यावेळी सांगितले.