मुंबई:-महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा रोजगार गुजरातला पळविणाऱ्या व शिवसेना पक्ष फोडण्याचे पाप करणाऱ्या भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार हल्ला चढविला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहिम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ दादरच्या खांडके बिल्डिंग परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
या मतदारसंघात ३ उमेदवार आहेत. त्यातले जिंकून येणारे उमेदवार माझ्या सोबत इथे उभे आहेत, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी महेश सावंत यांच्या विजयाचा व्यक्त केला.
मराठी माणसांसाठी लढणारा पक्ष, भूमीपुत्रासांसाठी लढणारा पक्ष अशी मनसेची ओळख होती मात्र आता ती गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष अशी ओळख झाली आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली.
राज्यातील 5 लाख भूमिपुत्रांचा रोजगार गुजरातला पळविणाऱ्या, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडण्याचा काम केलं. अशावेळी मराठी तरुणांच्या रोजगारासाठी आवाज उचलण्यासाठी मनसे गल्लीबोळात का दिसली नाही असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
गणोशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत गोळीबार केला ना मग येत्या 24 तारखेला आमच सरकार आल्यावर तुमच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करणार, असा सज्जड इशारा आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता सदा सरवणकर यांना दिला.
बदलापूर गुन्ह्यामध्ये एफआयआर लवकर घेतला नाही, वारकऱ्यांवर व मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. गेले दोन वर्षे ही महाराष्ट्राची लढाई म्हणून लढत आलो. महाविकास आघाडीच्या न्याय हक्कासाठी लढत आलो आहे. असे असताना मनसे केवळ गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
कोळीवाडयांचे सीमांकन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात झाले. मात्र त्यावर क्लस्टर डेव्हलपमेंट आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यावेळी कोणी विरोध केला का असा सवाल करत सत्ता आल्यावर मुंबईला हात लावून देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
निवृत्त पोलिसांना घर देण्याच काम सत्ता आल्यावर करणार असून जनतेची सेवा करायची आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेना ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई, सचिव साईनाथ दुर्गे, महिला उपनेत्या विशाखा राऊत
माजी नगरसेविका प्रिती पाटणकर , माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, काँग्रेसचे नेते राजन भोसले, आप आदमी पार्टीच्या प्रणाली राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद शेणकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मिलिंद रानडे, स्टार प्रचारक प्रियंका पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक अरुण (काका) कुलकर्णी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी खांडके बिल्डिंग मध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी येथील रहिवाशांना आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.