मुंबई:- शिवसेना (शिंदे गट) नेते व उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल स्वीकारत प्रकरण बंद केले आहे.
जोगेश्वरीतील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे पंचतारांकित हॉटेल्स बांधताना बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानग्या घेतल्याचा आरोप वायकर यांच्यावर होता. सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या तक्रारीनंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात वायकर, त्यांची पत्नी मनीषा वायकर व इतर व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती.
दरम्यान, महापालिकेने वायकर यांच्याविरोधातील तक्रार गैरसमजातून झाल्याचे मान्य करत प्रकरण बंद करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने अहवाल सादर केला. तो न्यायालयाने स्वीकारला आहे.
वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधून परवानगी न घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर आधारित तक्रारीमुळे वायकर यांना चौकशीसाठी हजर रहावे लागले.