रत्नागिरी : भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे. भाजपा कार्यकर्त्यांवर कर्तव्यनिष्ठेचे संस्कार आहेत. भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व देण्याचा संस्कार भाजपा कार्यकर्त्यांच्या मनावर कोरला गेला आहे.
त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि पालकमंत्री उदय सामंत यांना विजयी करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत, असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा निवडणूक समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, उदय सामंत सलग पाचव्यांदा विजयी होतील. त्यांच्या विजयात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असेल. भाजपाचा कार्यकर्ता भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व देणारा आहे. त्यामुळे कोणत्याही भावनांना न भुलता भाजपा कार्यकर्त्यांसह भाजपा समर्थक मतदार बंधू-भगिनी उदय सामंत यांना विजयी करतील.
ॲड. पटवर्धन यांनी सांगितले की, उदय सामंत यांच्या रूपाने अनुभवी नेतृत्व या मतदारसंघाला लाभले आहे. त्यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व या मतदारसंघाला पुन्हा लाभावे अशी इच्छा मतदारांचीही आहे, असे प्रचारामध्ये फिरताना दिसत आहे. उदय सामंत यांनी गेल्या २० वर्षांत केलेल्या कामातून आपली अशी ओळख निर्माण केली आहे. विकासाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. ते पाचव्यांदा विजयी होतील आणि पुन्हा मंत्री होतील. आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते ताकद पणाला लावून काम करू, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.