रत्नागिरी:-मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ आणि ज्येष्ठ विचारवंत उदय निरगुडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन कांबळी यांना गौरवण्यात आले. आज दुपारी हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष नमिता कीर, रमेश कीर, डॉ. प्रदीप ढवळ, साहित्यिक डॉ. सुरेश जोशी, आबा पाटील, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, कार्यवाह माधव अंकलगे आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कांबळी गेली तीस वर्षे शब्दकोडी साकारत आहेत. त्यांच्या शब्दकोड्यांची दखल लिम्का बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. कांबळी यांनी साकारलेल्या २५० × २५० म्हणजे ६२ हजार ५०० चौकोनांच्या दुसऱ्या कोड्याचीही नोंद इंडिया बुकमध्ये झाली. याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कांबळी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.