रत्नागिरी : रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स नसलेली तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या वृध्दाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ ऑक्टोबर दुपारी ११.४५ वा. वाडेकरवाडी येथील इन्क्लेव अपार्टमेंट समोर घडली होती.
किशोर विठोबा चव्हाण (वय ६२, रा. कर्ला, स्वराज्यवाडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालक वृध्दाचे नाव आहे. त्यांच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, २७ ऑक्टोबर रोजी किशोर चव्हाण हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- ०८-एस-७१५७) हिचे रि रजिस्ट्रेशन व इन्शूरन्स नसताना दुचाकीच्या दोन्ही हॅन्डलला जिन्नसाच्या पिशव्या लावून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत जात होते. त्यावेळी हॅन्डलला लावलेल्या पिशव्या पुढील टायरमध्ये अडकल्यामुळे अपघात होऊन त्यांना दुखापत होऊन दुचाकीचेही नुकसान झाले होते. याप्रकरणी शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.