रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण ९ उमेदवारांच्या अनामत रकमेपोटी ८५ हजार रुपयांची रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली होती. त्यापैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्याची अनामत रक्कम परत करण्यात आली. उर्वरित आठ उमेदवारांपैकी एक उमेदवार अनुसूचित जातीतील असल्याने त्याला निम्मी अनामत रक्कम भरावी लागली आहे. त्यामुळे आता अनामत रकमेपोटी ७५ हजार एवढी रक्कम शासनाकडे जमा आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून एकूण नऊ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले होते. यात शिंदेसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री उदय रवींद्र सामंत (तीन अर्ज), बहुजन समाज पार्टीचे भारत सीताराम पवार, उद्धवसेनेचे सुरेंद्रनाथ यशवंत माने आणि अपक्ष म्हणून उभे असलेले कैस’ नूरमहंमद फणसोपकर, कोमल किशोर तोडणकर, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील, दिलीप काशिनाथ यादव, उदय बने, पंकज प्रताप तोडणकर यांचा समावेश होता.
एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज भरले तरी त्याला अनामत रक्कम एकदाच भरावी लागते. त्यामुळे नऊ उमेदवारांनाच अनामत रक्कम जमा करावी लागली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांना त्याच्या निम्मी म्हणजेच १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तर विधानसभा निवडणुकीसाठी अनुक्रमे १० हजार आणि पाच हजार एवढी अनामत रक्कम भरावी लागते. त्यानुसार या नऊ उमेदवारांपैकी आठ उमेदवार खुल्या प्रवर्गातील असल्याने त्यांची प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे एकूण ८० हजार रुपये एवढी अनामत रक्कम कोषागार कार्यालयाकडे जमा झाली बहुजन समाज पार्टीचे भारत सीताराम पवार यांना निम्मीच रक्कम म्हणजे पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली. त्यामुळे अनामत रकमेपोटी एकूण ८५ हजार एवढी रक्कम जमा झाली.
या उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार उदय बने यांनी मुदतीत अर्ज मागे घेतल्याने त्यांची अनामत रक्कम रीतसर प्रक्रियेनंतर त्यांना परत करण्यात आली. त्यामुळे आता या मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या आठ उमेदवारांची ७५ हजार एवढ अनामत रक्कम कोषागार कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे.