चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही शेकडो मशालींच्या साक्षीने शुक्रवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. मशालींच्या प्रकाशझोतात अवघा परिसर उजळून गेला होता. शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरांमध्येही दीपोत्सव साजरा करण्यात आला.
गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्यावतीने दरवर्षी हा उत्सव होतो. यावर्षीही गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर निवडणूक आचारसंहितेमुळे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक न काढता शिवज्योत व पालखी थेट गोविंदगडावर नेण्यात आली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष ऍड. प्रसाद चिपळूणकर व अन्य पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या गडाच्या चारही दिशेतील बुरुजावर माशाली पेटवून उत्सव साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा लक्षवेधी ठरली. याशिवाय शहरात जुना कालभैरव, नवा कालभैरव, गांधारेश्वर, गौतमेश्वर, विरेश्वर आदी मंदिराच्या परिसरातही पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
परशुरामच्या डोंगरावरही दीपोत्सव
श्री क्षेत्र परशुराम देवस्थानतर्फे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा केला. मंदिरापासून काही अंतरावरील असलेल्या डोंगरावर एका भल्या मोठया दगडावर कोरीव काम केलेली पणती असून तेथेही हा उत्सव साजरा केला. यावेळी तरुणवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.