रत्नागिरी : दिवाळीच्या सुटीत प्रवाशांची गर्दी, बसेस उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन तसेच अधिकारी कर्मचाऱ्यानी दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळे रत्नागिरी विभागाला दहा दिवसांत 9 कोटी 54 लाखांचे उत्पन्न मिळाले.
दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे सण साजरा झाल्यानंतर पर्यटक जिल्ह्यात मोठया संख्येने आले. तसेच तिकीट सवलतीचा लाभ प्रवाशांनी घेतल्यामुळे एसटीतील प्रवाशांची गर्दी दहा दिवस कायम होती. पर्यायाने उत्पन्नात वाढ झाली. गेल्या काही वर्षांत तोटयात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आता उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी सुट्टीत पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या मागणीनुसार गाडया उपलब्ध करण्यात आल्या होत्या. ऐन सणासुदीच्या काळात अधिकारी, कर्मचायांनी सुट्टी न घेता प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली होती.