वाहन विक्रेतेच करणार रजिस्ट्रेशन, आजपासून कार्यवाहीला सुरुवात
मीटर असलेल्या वाहनांना मात्र वगळले
रत्नागिरी : आता वाहनधारकांना वाहन रजिस्ट्रेशनसाठी आरटीओ कार्यालयात जाऊन तासनतास गर्दीत उभे राहण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी वाहन खरेदी करणार त्याच ठिकाणी रजिस्ट्रेशन करून दिले जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकाची होणारी धावपळ आता वाचणार आहे. मात्र यामुळे आता खासगीकरणाचे वळण्याचे संकेत मिळत आहेत.
आता कंपनीतून बांधून आलेल्या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार वाहन विक्रेत्यांकडे देण्यात आले आहेत. 7 हजार 500 किलोपेक्षा कमी भार असलेल्या आणि कंपनीने बांधलेल्या वाहनांना वाहन विक्रेतेच क्रमांक देणार आहेत. याची अंमलबजावणी आज सोमवार 18 नोव्हेंबरपासून होणार आहे.
केंद्र सरकारच्या रस्ता वाहतूक मंत्रालयाने 4.0 प्रणालीवरून यापूर्वी नॉन ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहनांची नोंद विक्रेत्यांकडून केली जात आहे. त्यांना त्या वाहनाला ऑनलाईन क्रमांक दिला जात आहे. आता 7 हजार 500 किलोपेक्षा कमी भार क्षमतेच्या आणि कंपनीतून बांधून आलेल्या ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहनांची नोंदणी अधिकृत विक्रेत्यांकडून केली जाणार आहे. अशा वाहनांना क्रमांक देखील वाहन विक्रेते ऑनलाईन प्रणालीच्या मदतीने देणार आहेत. त्यासाठी आवश्यक आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी काढले आहेत.
एखाद्या वाहनासाठी पसंती क्रमांक राखून ठेवला आहे मात्र काही दुर्दैवी घटना घडून संबंधित व्यक्ती हयात नसेल तर त्याने घेतलेला क्रमांक 6 महिन्यांच्या आत कुटुंबातील सदस्यांच्या नावे हस्तांतरीत केला जाऊ शकेल. पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी याना पसंती वाहन क्रमांक हस्तांतरीत करून घेण्याचे अधिकार असल्याचे परिवहन अधिकाऱ्यानी सांगितले. पूर्णपणे कंपनीने बांधलेल्या वाहनांसाठी नोंदणीचे अधिकार वाहन विक्रेत्यांकडे दिले गेले असले तरी त्यातून ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी अशा मीटर असणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. प्रवासी वाहतूक मिटरद्वारे होणाऱ्या या वाहनांना अधिक काळजीपूर्वक तपासले जाणार आहे. परिवहन विभागाची कार्यपद्धती लोकाभिमुख होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.