खेड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांच्या पथकाने गेल्या १० दिवसांत अवैध मद्यतस्करी आणि गावठी दारुधंद्यांवरील धाडीत पावणे अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईत ६३ हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत करत ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जप्त केलेल्या ऐवजामध्ये तीन रिक्षांसह पिकअप टेम्पोचाही समावेश आहे.
निवडणुकीच्या पोलिसांनी हातभट्टीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्यांसह वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गावठी हातभट्टीचे दारूअड्डे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचून गावठी दारूसह विक्री करणाऱ्यांना रंगेहाथ पकडत आहे. पाच दिवसांपूर्वीच पोलिस पथकाने खेड- भरणे मार्गावर मद्यासह सव्वाचार लाखांचा ऐवज जप्त करत दोघांना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईत १२,६०० रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला होता. या पाठोपाठ दस्तुरी येथे २ लाख १५ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला होता. यामध्ये १५,६०० रुपये किमतीच्या विदेशी मद्यसाठ्याचा समावेश होता.
या तीन मोठ्या कारवायांनंतरही लोटे, बोरघर, गुणदे येथे गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर धाडी टाकत गावठी दारू जप्त केली. शहरातील शिवतर रोड येथेही बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारुअड्ड्यावर धाड टाकून ६,७२० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला होता.