भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांच्या सूचना
रत्नागिरी : मतदानपूर्व 72 तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी या काळात वस्तू खरेदी, ऑनलाईन व्यवहार, अवैध मद्य वाहतूक व खरेदी यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सविस्तर सादरीकरण करत जिल्ह्यामध्ये केलेल्या एकूण कारवाईची माहिती दिली.
विशेष खर्च निरीक्षक श्री बालकृष्णन यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद मीना, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे आदी उपस्थित होते. खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
गोवा राज्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीबाबत यंत्रणेने लक्ष ठेवून, ती जिल्ह्यात दाखल होणारच नाही याची काळजी घ्यावी. तसेच कर्नाटक राज्यातूनही वाहतूक होण्याची शक्यता असल्याने आंतरराज्य सीमांवरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश विशेष खर्च निरिक्षक श्री. बालकृष्णन यांनी दिले.
संशयित ऑनलाईन व्यवहार तपासा
निवडणूक काळात मोठ्या रकमांबरोबरच लहान लहान संख्येने जास्त व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत तपासणी करा. कोणत्याही प्रकारे मतदारांवर परिणाम करणाऱ्या अर्थिक व्यवहार होणारच नाहीत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश श्री.बालकृष्णन यांनी दिल.