दोन दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांविरोधात केले होते मुंडण आंदोलन
रत्नागिरी:-जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. हल्ला करून दुचाकीवरून आलेले दोघे हल्लेखोर फरार झाले आहेत. ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. अण्णा जाधवावरील हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अण्णा जाधव यांच्यावर रविवारी नरवण येथे हा जीव घेणा हल्ला करण्यात आला. ते दुपारी बाजारातून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवत आमच्या उमेदवाराची बदनामी करतो काय? तुला बघुन घेतो म्हणत अण्णा जाधव यांच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र अण्णा जाधवांनी त्याला प्रतिकार करताना डावा हात पुढे केल्याने त्याच्या उजव्या हातावर हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून जखमी केले. अण्णा जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी मदतीसाठी आरडा ओरडा करताच हल्लेखोरांनी जाधव यांची गाडी चारचाकी फोडून फरार झाले. अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी नरवणमध्ये धाव घेतली. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती डीवायएसपी राजमाने यांना कळताच गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच गुहागर – चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात अण्णा जाधव यांनी मुंडण आंदोलन केले होते. त्यानंतर आता जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या डाव्या हातावर चाकूने सपासप वार करून जखमी केले आहे. तसेच गाडीचेही नुकसान करून हल्लेखोर पळून गेले आहेत.
हा हल्ला राजकीय हेतूने करण्यात आला आहे की वयक्तिक कारणातून करण्यात आला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.