चिपळुणातील वाडसाडी धनगरवाडीत अजूनही रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, मतदारांनी कशासाठी करावं मतदान?
चिपळूण : सह्याद्री खोऱ्यातील उंच डोंगर-दऱ्यातील धनगरवाड्यात आजही रस्ता नाही, पिण्यासाठी पाणी आणि विजेची सुविधा पोहोचलेली नाही. मात्र, दुर्गम भाग असलेल्या कोळकेवाडी वाडसाडी धनगरवाडीत अधिकारी, कर्मचारी पोहोचले होते. तब्बल दीड तासाची पायपीट करत पोहोचून तेथील दोन ज्येष्ठ नागरिकांचे मतदान करवून घेतले.
चिपळूण विधानसभा मतदारसंघात १४ नोव्हेंबरपासून गृह मतदानाला सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी हा कार्यक्रम राबवण्यात आला. या मतदानासाठी पथकांची निर्मिती केली असून, यातील काही पथके सह्याद्री खोऱ्यात असलेल्या वस्तींमध्ये पोहोचत आहेत. यातील काही मतदार उंच डोंगर माथ्यावर धनगरवाड्यात वास्तव्यास आहेत. तालुक्यातील कोळकेवाडी वाडसाडी धनगरवाडीत गृह मतदानासाठी एक पथक शुक्रवारी पोहोचले होते. ६ जणांचा समावेश असलेले हे पथक सकाळी ८ च्या सुमारास मोहिमेवर रवाना झाले.
मुख्य रस्त्यापासून डोंगर माथ्यावर असलेल्या या धनगरवाडीत जाताना झाडी, झुडपे व जंगल मार्गाने प्रवास करताना तब्बल दीड तासाची पायपीट करावी लागली. या पथकाच्या निरीक्षक खत्री, समवेत केंद्रस्तरीय अधिकारी मंगेश पिंगळे, मतदान अधिकारी सपना जाधव, केंद्र अध्यक्ष गणेश लोखंडे, पोलिस चाटे, छायाचित्रकार यश कासार ग्रामपंचायत कर्मचारी संदेश मोहिते धनगरवाडीत पोहोचले. तेथील दोन ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून सांगत त्यांचे मतदान करून घेतले. ही मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा दीड तासाची पायपीट करीत दुपारी साडेबाराच्या सुमारास हे पथक खाली पोहोचले.