दापोली:-तालुक्यातील हर्णे बंदरातील नौकेवर समुद्रात परराज्यातील फास्टर नौकेच्या खलाशांनी शिशाच्या गोळयाच्या सहाय्याने हल्ला चढवल्याची घटना बुधवारी घडली. यामध्ये नौकेवरील तांडेल जखमी झाला असून नौकेचे किमान 1 लाखाचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा मत्स्य परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी केला.
13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास हर्णे बंदरामध्ये 6 ते 7 नॉटिकल मैलाच्या अंतरावर फास्टर नौका मासेमारी करत होत्या. त्याच ठिकाणी हर्णे बंदरातील पाजपंढरी येथील मोरेश्वर कानू चोगले यांची सहा सिलिंडरची मंगलमूर्ती मासेमारी नौका जाळे टाकून व नांगर टाकून उभी होती. जवळच कर्नाटकच्या फास्टर नौका मासेमारी करत होत्या. तेवढयात एका फास्टर नौकेने जाळे ओढत असताना मोरेश्वर यांच्या नौकेचा नांगरच ओढत नेला. त्यावेळी बोटीचा नांगर त्यांच्या जाळ्यात अडकला होता.
यानंतर मंगलमूर्ती या नौकेचे तांडेल रत्नाकर धर्मा चोगले यांनी त्या फास्टर नौकेच्या खलाशाला जाऊन फक्त नांगर जाळ्यात अडकला आहे, असे सांगताच त्या नौकाचा तांडेल आणि खलाशांनी बाचाबाची करायला सुरुवात केली. तेवढयात बाजूस असलेल्या तीन-चार फास्टर नौका तेथे हजर झाल्या. त्यांनी हर्णे बंदरातील नौकेवर थेट शिशाया गोळयाया सहाय्याने हल्ला चढवला. यामध्ये नौकेच्या केबिनच्या काचा फुटल्या आणि यामध्ये तांडेल रत्नाकर चोगले हा जखमी झाला. तेथे आजूबाजूला असलेल्या हर्णे बंदरातील नौका त्यांना वाचवायला आल्या असता फास्टर नौकांनी लगेच तिथून पळ काढला. यामुळे पुढील अनर्थ टळला.