नावाजलेल्या जिजाऊ शिक्षण संस्थेतून राजकारणात गेल्यामुळे झाली सर्वत्र टीका
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नुकतेच रत्नागिरीचे उप तालुकाप्रमुख पद स्वीकारलेले प्रथमेश गावणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कारण आधार देण्याऐवजी झालेली टिकाटिप्पणी आणि जर आपल्या सहकाऱ्याना देखील न्याय मिळवून देणार नसू किंवा आपल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांवर देखील शिंतोडे उडवले जाणार असतील तर आपण राजकीय प्रवास करण्याचा घेतलेला निर्णय थांबवत त्या राजकीय पक्षातून मिळालेल्या पदाचा जाहीर राजीनामा देत असल्याचे गावणकर यांनी सांगितले आहे.
आपल्या सहकाऱ्यांसोबत गावणकर यांनी राजीनामा देत असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींकडे तो राजीनामा मी लिखित स्वरूपात पाठवणार असल्याचे म्हटले आहे. गेले चार ते पाच वर्षाहून अधिक काळ मी सामाजिक, आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये काम करतोय. आणि हे काम करत असताना ते कुठल्याही व्यक्तिगत जाती समूहासाठी नव्हतं. तर सर्व जातीसमूहासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये एक मोठय़ा प्रमाणामध्ये माझा एक सहकारी वर्ग तयार झाला आहे. हे सगळं चालू असताना जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून जिजाऊ संस्थेचे काम आम्ही सगळ्यांनी चालू केलं आणि सहा ते आठ महिन्यांमध्ये हे जिजाऊ संस्थेचं वारं आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये निर्माण केलं.
‘हे सगळं करत असताना विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि मग एक विचार यायला लागला की ज्या पद्धतीने आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय त्याच पद्धतीने जर आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करू शकलो तर आपल्या सहकाऱ्याना जे वर्षानुवर्ष प्रस्थापित पक्षांपासून वंचित आहेत, त्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. हा विचार करून माझी आई, माझ्या कुटुंबातील सदस्य, माझे इतर सहकारी मित्र, सामाजिक क्षेत्रात असलेले माझे सगळे सहकारी असतील यांच्या समवेत चर्चा करून निर्णय घेतला. मग त्या पद्धतीने समोर एक अजेंडा ठेवून मंत्री उदय सामंत यांच्या समवेत साधक-बाधक चर्चा करून आपण आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
मंत्री उदय सामंत यांनी मी ज्या ज्या वेळेला त्यांना अप्रोच होण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला त्यांनी सन्मानाने वागणूक दिली, पण जेव्हा 29 ऑक्टोबरला हा प्रवास चालू झाला त्यावेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल व्यक्तिगतरित्या असतील किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्यक्तिगत रित्या असतील प्रथमेश किती चुकीचा हेच मांडण्याचे सातत्याने प्रयत्न झाले. वाईट त्या गोष्टीचं वाटलं नाही कारण जेव्हा पण मी हा निर्णय घेतला तेव्हा माझ्या सगळ्या सहकाऱ्याना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला होता. पुढे चालत माझ्यामुळे कोणताही माणूस दुःखी होणार नाही याची खात्री खबरदारी मी आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी घेत आलो, किंबहुना माझ्यामुळे प्रत्येकाला फायदा होईल हाच विचार सातत्याने केला आणि हे सगळे एक बाजू असताना देखील जेव्हा दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोणत्यातरी आर्थिक अमिषा पोटी हा राजकीय निर्णय घेतोय किंवा कुठल्यातरी आर्थिक लालसे पोटी घेतोय तेव्हा मात्र मनाला प्रचंड दुःख होत असल्याची खंत गावणकर यांनी व्यक्त केली.
जेव्हा या सगळ्या गोष्टी माझ्या कुटुंबापर्यंत यायला लागल्या आणि जेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांवरती शिंतोडे उडवायला सुरुवात झाली. तेव्हा खरंच मनाला वेदना होत होत्या. अनेक मोठय़ा प्रमाणात जो सुशिक्षित वर्ग माझ्या समवेत होता त्याच्यामध्ये देखील मोठय़ा प्रमाणामध्ये नाराजीचा सूर मला सातत्याने पाहायला मिळत होता. हे सगळं चालू असताना ज्या पद्धतीने टीका टिपणी सुरू राहिली. हे करून जर आपल्या सहकाऱ्यांना देखील न्याय मिळवून देणार नसू किंवा आपल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांवर देखील शिंतोडे उडवले जाणार असतील तर आपण या राजकारणात नसलेले चालेल या निर्णयावर आलो.
तूर्तास आज रोजी मी हा राजकीय प्रवासात थांबण्याचा निर्णय घेतोय. येणाऱ्या काळात जी काही राजकीय वाटचाल असेल किंवा सामाजिक वाटचाल असेल की माझ्या सगळ्या सहकाऱ्यासोबत पुन्हा एकदा तालुक्यामध्ये जे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत मी बसेन आणि ते ठरवतील तो निर्णय घेणार आहे. आज माझे सगळे सहकारी माझ्या समवेत आहेत हीच माझी खरी ताकद आहे. येणाऱ्या काळामध्ये मात्र अशा पद्धतीचे निर्णय घेताना व्यवस्थित विचार केला जाईल. माझ्या ह्या निर्णयामुळे जिजाऊ संस्थेवरती देखील ज्या पद्धतीने शिंतोडे उडवले गेलेत त्याबद्दल मनापासून माफी मागतो,‘ असे जिजाऊ संस्थेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राहिलेल्या प्रथमेश गावणकर यांनी सांगितले.