घटनास्थळावरुन कार चालक फरार
संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावरील निढळेवाडी येथे कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक ठार झाला असून अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक फरार झाला. अस्लम सुलेमान बोट (54, आरोग्य मंदिर, रत्नागिरी, मूळ कळबस्ते संगमेश्वर) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर त्यांची पत्नी व नात हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास झाला.
सविस्तर वृत्त असे की, रिक्षा चालक अस्लम बोट हे आपल्या ताब्यातील रिक्षा (MH 08 E 7089) ने पत्नी व नातीला घेऊन शनिवारी दुपारी रत्नागिरीहून संगमेश्वर कलंबस्ते येथे उरुसासाठी गेले होते. दर्शन घेऊन सायंकाळी ते संगमेश्वर हून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. निढळेवाडी येथे आले असता चारचाकी रेनॉल्ट (MH 08 AG 2687) गाडीने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षा चालक अस्लम बोट यांचा मृत्यू झाला. तर रिक्षात असलेले अस्लम यांच्या वृध्द पत्नी व नात (नाव समजू शकलेले नाही) दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालकाने गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरुन पलायन केले. अपघाताचा जोरदार आवाजाने निढळेवाडी येथील ग्रामस्थानी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर संगमेश्वर पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अस्लम बोट यांना व अन्य दोन जखमींना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बोट यांना मयत घोषित केले. दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पलायन केलेल्या चारचाकी चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिस करत आहेत.